नवी दिल्ली - योग्य संधी मिळाली तर आपण भारतात परतणार आणि देशासाठी काम करणार, असे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि विख्यात अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी म्हटले आहे. 'दि थर्ड पिल्लर' या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देतांना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
रघुराम राजन यांच्या काळातच नोटाबंदी झाली होती. तर, त्यांनी भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेतले, अशी त्यांची ख्याती आहे. नुकतीच त्यांनी दि थर्ड पिल्लर नावाचे एक पुस्तक प्रकाशित केली आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. आपल्या पुस्तकावर बोलताना त्यांनी पत्रकारांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.
मी सध्या ज्या ठिकाणी आहे तेथे अत्यंत आनंदात आहे. मात्र, योग्य संधी मिळाली तर नक्कीच देशात परतणार, असे ते म्हणाले.
राजन सध्या शिकागो विद्यापीठ अमेरिकेच्या अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून शिकवत आहेत. आपण भारतात आलो तर अर्थमंत्री म्हणून काम करण्याची आपली इच्छा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि तेलुगू देशम पक्षांची आघाडी जिंकून आली तर ही वेळ आपल्यासाठी योग्य असेल, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
भारतामध्ये होणाऱ्या यावेळीच्या निवडणूका अत्यंत महत्वाच्या आहेत. या निवडणुकांनी भारताचे भविष्य ठरणार आहे, असेही त्यांचे म्हणणे होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडेच 'न्याय' योजनेची घोषणा केली. ही निवडणूक जिंकल्यास काँग्रेस देशातील २० टक्के गरीब लोकांना ७२ हजार प्रति वर्ष रुपये देणार, अशी ती घोषणा आहे. या घोषणेचा ड्राफ्ट तयार करणाऱ्या समितीमध्ये रघुराम राजन होते, अशीही चर्चा आहे.
रघुराम राजन आरबीआयचे २३ वे गव्हर्नर होते. त्यांनी सप्टेंबर २०१३ ते सप्टेंबर २०१६ पर्यंत हे पद सांभाळले आहे. २००३ आणि २००६मध्ये राजन आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी (आयएमएफ) चे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि आयएमएफ येथे संशोधन संचालक होते.