चंदीगड - पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे पाठवला आहे. 'सिद्धू यांनी राजीनामा दिल्याचे मला माहित झाले आहे. त्यांनी राजीनामा चंदीगडच्या पत्यावर पाठवला आहे. मी राजीनामा वाचून निर्णय घेईल', असे अमरिंदर सिंग म्हणाले आहेत.
'मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर मी सिद्धू यांच्याकडे चांगले आणि महत्त्वाचे खाते सोपवले होते. मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा आहे. माझ्या कार्यालयात राजीनाम्याचे पत्र पोहोचवल्याचे मला सांगण्यात आले आहे. मी राजीनामा वाचून नंतर काय करता येईल, याचा विचार करेन,' असे ते म्हणाले आहेत.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी बऱ्याच काळापासून चाललेल्या वादानंतर त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. मात्र अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्यासोबत कोणत्याही समस्या नसल्याचे सांगितले.