पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीने NEET परीक्षेसाठी मागितला जामीन - pulwama accused NEET exam
परीक्षेला जाण्यासाठी आपल्याला जामीन मिळावा, अशी मागणी वाईझ-उल-इस्लाम याने जम्मू येथील NIA (एनआयए) न्यायालयात केली आहे. ३ सप्टेंबरला या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
![पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीने NEET परीक्षेसाठी मागितला जामीन NEET](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8641266-443-8641266-1598966844598.jpg?imwidth=3840)
श्रीनगर - पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आरोपी वाईझ-उल-इस्लाम याने (NEET) नीट पूर्व परीक्षेसाठी जामीन मिळावा म्हणून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. परीक्षेला जाण्यासाठी आपल्याला जामीन मिळावा, अशी मागणी त्याने जम्मू येथील NIA (एनआयए) न्यायालयात केली आहे. ३ सप्टेंबरला या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
वाईझ-उल इस्मालच्या जामीन अर्जाला आम्ही विरोध करणार असल्याचे एनआयएचे वकील विपीन कालरा यांनी सांगितले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मागील आठवड्यात जैश- ए- मोहम्मदचा मोऱ्हक्या मसूद अझहर अल्वी आणि इतर १८ जणांविरोधात पुलवामा हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. १५ सप्टेंबरपर्यंत हे प्रकरण एनआयएच्या न्यायालयात सुनावणीला येणार आहे.
एनआयएच्या सुत्रांनुसार, पुलावामा हल्ल्याप्रकरणी १३ हजार ५०० पानी आरोपपत्र अधिकाऱ्यांनी सादर केले आहे. यामध्ये अनेक पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. मसूद अझहर अल्वी, रौफ अझगर अल्वी, अमर अल्वी, मोहद इस्माईल, मोहम्मद उमर फारुख, मोहद कामरान अली, कादीर यासिर या पाकिस्तानी नागरिकांचा आरोपपत्रात समावेश आहे.
सीआरपीएफच्या ताफ्यावर झाला होता हल्ला
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे २०१९ साली हल्ला झाला होता. सीआरपीएफचा ताफा जात असताना दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार वाहनांच्या ताफ्यात घुसविली. यावेळी झालेल्या स्फोटात ४० जवान शहीद झाले होते. तर अनेक जण जखमी झाले होते. सीआरपीएफच्या गाड्यांतून सुमारे अडीच हजार जवान जात असताना पूर्वनियोजितपणे हा हल्ला घडवून आणला होता. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी काश्मीरमधील हस्तकांना मार्गदर्शन करत हा भ्याड हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी भूमीवर सर्जिकल स्ट्राईकही केली होती.