नवी दिल्ली - माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत.
सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा, धैर्य आणि अखंडपणाचे प्रतिबिंब आणि लोकप्रिय नेत्या या देशाने गमावल्या आहेत. त्या इतरांना मदत करण्यासाठी नेहमीच तयार असायच्या. त्यांनी केलेल्या देशसेवेबद्दल त्या नेहमीच स्मरणात राहतील, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय आज संपला आहे. जनतेच्या सेवेसाठी आणि गोरगरिबांच्या जीवनासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे भारत दु: खी आहे. सुषमा स्वराज या देशातील कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणास्त्रोत होत्या. तसेच सुषमाजी एक उत्कृष्ट वक्त्त्या आणि संसद सदस्य होत्या. पक्षपातळीवर सर्वांना त्यांचे कौतुक व त्यांच्याबद्दल आदर होता. भाजपच्या विचारसरणीच्या आणि हितसंबंधांच्या बाबतीत त्या कोणतीही तडजोड करायच्या नाहीत. पक्षासाठी त्यांचे योगदान खूप मोठे राहिले आहे.
सुषमा स्वराज या एक उत्कृष्ट प्रशासक होत्या. त्यांनी हाताळलेल्या प्रत्येक मंत्रालयात त्याचा दर्जा कायम ठेवला. विविध देशांसोबत भारताचे संबंध सुधारण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मंत्री म्हणून आम्ही त्यांची दयाळू बाजू पाहिली. जगाच्या कोणत्याही भागात संकटात सापडलेल्या भारतीयांना त्यांनी मदत केली, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुढे ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात सुषमाजींनी परराष्ट्र मंत्री म्हणून घेतलेले परिश्रम मी विसरू शकत नाही. त्यांची प्रकृती ठीक नसतानाही त्या त्यांच्या कामाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असत. सुषमा स्वराज यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. त्यांनी देशासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना नेहमीच आठवले जाईल. या दुखःच्या क्षणी माझे विचार त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांसह आहेत.