राजसमंद - राजस्थान पोलीसमधील एका हेड कॉन्स्टेबलला अज्ञात गुंडांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अब्दुल गनी (४८) असे या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे.
अब्दुल गनी हे बरार ग्राम पंचायतीच्या रातिया थाक गावात जमिनीच्या वादासंदर्भात तपासासाठी गेले होते. तेथून परतताना गावापासूनच सुमारे 1 किलोमीटर अंतरावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारस त्यांच्यावर हल्ला झाला. यानंतर जखमी हेड कॉन्स्टेबलला स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेद्वारे सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, भीम पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अब्दुल गनी एका प्रकरणाच्या तपासासाठी दुपारी दोन वाजता पोलीस ठाण्यातून गेले होते. यानंतर सायंकाळी ते बरार-टारगट रोडवर गंभीर स्थितीत आढळून आले. येथून त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. येथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काही अज्ञात गुंडांनी अब्दुल गनी यांना जबर मारहाण केली होती. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. यासंदर्भात आम्ही सखोल तपास करत आहोत.
मृत अब्दुल गनी यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. बऱ्याच दिवसांपासून ते कुंवारिया येथे भाड्याच्या घरात राहात होते.