नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी याने मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्रात सादर केले आहे. यामध्ये 'मी देश सोडून पळालो नाही. तर, उपचारासाठी मला देशाबाहेर जावे लागलेय,' असे म्हटले आहे. मेहूल चोक्सीने न्यायालयात त्याच्या आजाराचे पुरावेही सादर केले आहेत.
आपण सध्या अँटिग्वामध्ये राहत असून तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करत असल्याचे चोक्सीने म्हटले आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास दिल्यास तपास अधिकारी चौकशीसाठी येथे येऊ शकतात, असेही त्याने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
'पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यामुळे मी भारतातून पलायन केले नाही. उपचारांसाठी मला देश सोडावा लागला. माझ्या तब्येतीत सुधारणा झाल्यास मी लवकरच भारतात परतेन. सुनावणीवेळी मला न्यायालयात उपस्थित राहण्याची इच्छा आहे. पण आजारपणामुळे प्रवास करू शकत नाही. सध्या विशेष न्यायालयासमोर आणि तपास अधिकाऱ्यांसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्याला उपस्थित राहण्याची माझी तयारी आहे,' असे चोक्सीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच, आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असा दावाही त्याने या पतित्रापत्रात केला आहे.
गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या पीएनबी घोटाळ्यात १३००० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. यामध्ये नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे प्रमुख आरोपी आहेत. त्यांनी बँकेला फसवून कर्जे न फेडताच देशातून पळ काढला आहे. या घोटाळ्यात बँकेच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.