कोलकाता - पोर्ट ट्रस्टच्या 150व्या वर्धापन दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवींद्र सेतू(हावडा ब्रिज) येथील लाइट अँड साऊंड सिस्टमचे अनावरण केले. यावेळी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि गव्हर्नर जगदीप धनखारदेखील उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसांच्या कोलकाता दौर्यावर आहेत. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150व्या वर्धापन दिनी उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, "कोलकात्यात 'बिपलोबी भारत' नावाचे एक संग्रहालय स्थापन केले जावे, असा माझा मानस आहे. या संग्रहालयात नेताजी सुभाषचंद्र बोस, अरबिंदो घोष, राश बिहारी बोस, खुदीराम बोस, देशबंधू, बाघा जतिन, बिनॉय, बादल, दिनेश अशा प्रत्येक महान स्वातंत्र्य सेनानीसाठी विशेष जागा असेल" बेलविडिअर हाऊसला जागतिक दर्जाच्या संग्रहालयात रूपांतरित करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - 'सीएए-एनआरसी मागे घ्या' पंतप्रधान मोदींकडे ममता बॅनर्जी यांची मागणी
दरम्यान, मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीएए आणि एनआरसीचा निषेध नोंदवण्यासाठी कोलकात्यात सर्वत्र आंदोलने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील पंतप्रधानांसोबतच्या भेटीदरम्यान सीएए आणि एनआरसी कायदे मागे घेण्याची मागणी केल्याचे स्पष्ट केले आहे.