भुवनेश्वर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्फान वादळाचा तडाखा बसलेल्या भागाची हवाई पाहणी केली. यामध्ये पश्चिम बंगालनंतर ते ओडिशामध्ये दाखल झाले होते. ओडिशाची पाहणी केल्यानंतर त्यांनी राज्याच्या मदतीसाठी ५०० कोटीं रुपये देण्याची जाहीर केले आहे.
यावेळी त्यांनी राज्यपाल गणेशी लाल, मुख्यमंत्री नवनी पटनाईक तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रताप सारंगी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कमीत कमी जीवीतहानी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
आपण सर्व आधीच कोरोनाशी लढत आहोत. त्याचवेळी ओडिशामधील लोक या चक्रीवादळालाही तोंड देत आहेत. यातही राज्यसरकारने केलेल्या चांगल्या नियोजनामुळे कमीत कमी जीवीतहानी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव वाचवण्यात आल्यामुळे मी ओडिशा सरकारचे अभिनंदन करतो, असे मत मोदींनी यावेळी व्यक्त केले. तसेच, या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून हवी ती मदत राज्य सरकारला देण्यात येईल. सोबतच, बचावकार्याचा वेग वाढवण्यासाठी मदत म्हणून केंद्राकडून राज्य सरकारला ५०० कोटी रुपये देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
अम्फान वादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी केंद्रातर्फे एक पथक पाठवण्यात येईल असे पंतप्रधानांनी सांगितले. या पथकाने दिलेल्या अहवालानुसार राज्य सरकारला पुढील मदत जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
या चक्रीवादळाचा आतापर्यंत ४४ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे.
हेही वाचा : 'डब्ल्यूएचओ'च्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून हर्ष वर्धन यांनी स्वीकारला पदभार