नवी दिल्ली - मागील ४० दिवसांपासून शहरातली विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या ३ हजार ३०० तबलिगी जमातच्या सदस्यांना मुक्त करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. कोरोना चाचणी नकारात्मक आली असली तरी त्यांना ४० दिवसांपासून क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. याशिवाय इतर कोरोनाचा संसर्ग झाला नसतानाही त्यांना अनेक दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
शुक्रवारी १५ मे ला याबाबतची याचिका सुनावणीला येण्याची शक्यता आहे. १४ दिवसांचा क्वारंटाईन अवधी असताना जास्त दिवस का ठेवण्यात आले. नियमानुसार कारवाई का करण्यात आली नाही. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते शाबिहा कादरी यांनी वकिलाद्वारे याचिक दाखल केली आहे.
हेही वाचा - तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी झालेले घरी जाऊ शकतात - दिल्ली सरकार
यातील अनेक तबलिगी जमातच्या सदस्यांना अवैधरित्या क्वारंटाईन सेंटरमध्ये डांबण्यात आले आहे. यातील अनेकांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून याचे कारणही विचारले आहे. मात्र, त्यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही असे कादरी म्हणाल्या. 'अधिकारी कर्तव्य बजावण्यास अपयशी ठरले असून क्वारंटाईनच्या नावाखाली लोकांना डांबून ठेवणे नियमांचे उल्लंघन आहे', असे कादरी यांचे वकिल शाहिद अली यांनी म्हटले आहे.
तबलिगी जमात आणि कोरोनाचा प्रादुर्भाव
यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात दिल्लीतील मरकज निजामुद्दीन येथे तबलिगी जमातचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परदेशातील नागरिकांसह संपूर्ण देशातील नागरिकांनी हजेरी लावली होती. मात्र, यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोरोनाचा विषाणू भारताच्या अनेक भागांमध्ये पसरला. दिल्ली, तामिळनाडूतील सर्वात जास्त रुग्ण तबलिगी जमात कार्यक्रमाशी संबधीत आढळून आले. इतरही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले. पर्यटन व्हिसावर भारतात येवून धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या परदेशी नागरिकांवर खटले दाखल करून तुरुंगातही टाकण्यात आले आहे.