भोपाळ - मध्यप्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यात महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रासोबत सतत बोलत असल्याने एका अल्पवयीन मुलींचे काही नागरिकांनी मुंडण केले आहे. ही घटना जिल्ह्यातील सोंडवा पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. समाजामध्ये अजूनही किती मागासलेपणा आहे, हे या घटनेतून दिसून येते.
ही घटना २५ फेब्रुवारीला घडल्याचे माहिती मिळाली आहे. मुलीचे मुंडन करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, पोलिसांनी या प्रकरणी चार युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पॉक्सोसह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल
'मित्रासोबत बोलत असल्याचा राग आल्याने काही नागरिकांनी माझे केस कापले, तसेच धमकीही दिली, असे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी चार युवकांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलीस अधिकारी धीरज बब्बर यांनी सांगितले. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. बाल अत्याचार आणि संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.