श्रीनगर - जम्मू काश्मीर राज्याची स्वायत्तता काढून घेतल्यानंतर अनेक स्थानिक नेत्यांना घरात स्थानबद्ध करून ठेवले होते. मात्र, आता अनेक नेत्यांना सोडण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रशासित प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काश्मीरचा विशेष दर्जा पुन्हा मिळावा म्हणून राज्यातील सहा पक्षांनी बैठकही घेतली आहे. दरम्यान, पिपल्स डेमोक्रटिक पक्षाच्या नेत्यांना एका बैठकीला जाण्यासाठी घरातून बाहेर पडू दिले जात नाही, असा आरोप पक्षाच्या प्रवक्त्याने केला आहे.
आज(गुरुवार) पीपीडी पक्षाचे जनरल सेक्रेटरी गुलाम नबी लोन हनजुरा यांनी नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र, काश्मीर प्रशासनाने पक्षाच्या नेत्यांना घरातून बाहेर पडू दिले नाही. त्यांना घरात बेकायदेशीर रित्या बंदी बनविले आहे, असा आरोप पक्षाचे प्रवक्ते सुहिल बुखारी यांनी केला आहे. काश्मीरातील नेते मुक्त करण्यात आले आहेत, हा दावा सरकारकडून करण्यात येत आहे, मात्र, हा दावा खोटा असल्याचे उघड झाल्याचे बुखारी म्हणाले. सरकारचा खोटेपणा उघडा पडला आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थांसमोरही खोटे बोलल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, सीपीआयएम नेते एम. वाय तारिगामी यांनी काश्मीर प्रशासनाचा निषेध केला आहे. राजकीय पक्षांनी बैठका घेण्यासही भाजप सरकार घाबरत आहे, हे आश्चर्यकारक आहे. मागील एक वर्षांपेक्षा जास्त काळापासून काश्मीरातील स्थिती सर्वसामान्य असल्याचे म्हणत सरकार खोटे बोलत आहे. जर सर्व स्थिती सामान्य असेल तर पक्षाच्या नेत्यांना घरात बंदी का करून ठेवले आहे, असे तारिगामी यांनी म्हटले आहे.