नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संसदेची स्थायी समिती उद्या (बुधवार) बैठक घेणार आहे. या बैठकीला आरोग्य मंत्रालयातील अधिकारी, आणि एआयआयएमएसचे संचालक डॉ. रणदीप गुलेरियाही उपस्थित असतील. राज्यसभेच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली.
काँग्रेस खासदार आनंद शर्मा हे या स्थायी समितीचे प्रमुख आहेत. या बैठकीला देशातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केंद्राने घेतलेल्या निर्णयांबाबतही चर्चा होणार आहे. यापूर्वी जुलैमध्ये याबाबत बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीला कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या उच्च दरांविषयी, तसेच या औषधांच्या काळ्या बाजाराविषयी चर्चा करण्यात आली होती.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत अधिवेशन कसे भरवता येईल याबाबत चर्चा सुरू आहेत.
मंगळवारी झालेल्या ५५ हजार ७९ नव्या कोरोना रुग्णांच्या नोंदीनंतर, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २७ लाखांच्या पुढे गेली. तसेच, ८७६ नव्या मृत्यूंच्या नोंदीमुळे देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ५१ हजार ७९७वर पोहोचली आहे.
हेही वाचा : महामारीचा परिणाम; 100 हून अधिक देशांमध्ये मुलांच्या संरक्षण करणाऱ्या सेवा विस्कळित