चेन्नई : श्रीलंकेच्या नौदलाच्या ताब्यात असणाऱ्या ३६ भारतीयांची सुटका करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रयत्न करावे, अशी मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मोदींना पत्र लिहीत, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला याबाबत तातडीने निर्देश देण्याची विनंती केली आहे.
"14 डिसेंबर 2020ला झालेल्या दोन घटनांकडे मी तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. पाच यांत्रिक मासेमार बोटींमध्ये असणाऱ्या ३६ भारतीय नागरिकांना श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेतले आहे. तामिळनाडूच्या रामनाथपूरम आणि थूतुकुडी या दोन ठिकाणचे हे नागरिक आहेत. त्यानंतर आतापर्यंत श्रीलंकेने या लोकांना सोडले नाही. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आपण परराष्ट्र मंत्रालयाला द्यावेत" असे या पत्रात लिहिले आहे.
परराष्ट्र मंत्रालय श्रीलंकेच्या संपर्कात..
गुरुवारी याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, की आम्ही श्रीलंकेतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. ३६ भारतीयांना ताब्यात घेतलेल्या बातमीची पुष्टी झाल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना केली जाईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली. यासोबतच ते म्हणाले, की तामिळनाडूच्या मच्छिमारांचा मुद्दा हा भारत-श्रीलंका द्विपक्षीय चर्चांमध्ये वारंवार उपस्थित केला जातो. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदी मध्यप्रदेशच्या शेतकऱ्यांशी करणार चर्चा; कृषी कायद्यांच्या फायद्यांबद्दल देणार माहिती