नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, गुरू नानक यांच्या ५५० जयंतीनिमित्त कर्तारपूर मार्ग खुला करत असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. ही माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या विशेष सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांनी दिली आहे.
यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये टर्म्स ऑफ रेफरेंसनुसार कॉरिडॉरला अंतिम रुप देऊन त्याचे उद्धाटन करण्यात येईल. ज्याप्रमाणे मुस्लिमांना मक्का आणि मदीना आहे. त्याचप्रमाणे शीखांसाठी गुरु नानक पवित्र आहेत, असे त्या म्हणाल्या.
'पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरला चालना देण्यासाठी पूर्णपणे कटीबद्ध आहे आणि त्यासाठी सहकार्य देखील करत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता डॉ. मोहम्मद फैसल यांनी म्हटले होते.
भारतातील शीख भाविकांना कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. दररोज जवळपास पाच हजार भाविक कर्तारपूर साहिब येथे जाऊन दर्शन घेऊ शकतात. १५२२ मध्ये गुरुनानक यांनी कर्तापूर येथे पहिले गुरुद्वारा स्थापन केले तसेच इथेच त्यांनी आपला शेवटचा श्वासही घेतला. त्यामुळे शीख समुदायासाठी हे ठिकाण खूपच महत्वाचे आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून ४ किमी लांब पाकिस्तानात आहे.