नवी दिल्ली - शांघाय सहकार्य संघटनेची बैठक (एससीओ) किर्गिस्तान येथे होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. परंतु, यासाठी त्यांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास करावा लागणार आहे. यासाठी भारताने पाकिस्तानकडे परवानगी मागितली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून लवकरच पंतप्रधान मोदींच्या विमानाला हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी मिळणार आहे.
भारतीय वायुसेनेने २६ फेब्रुवारील जैश-ए-मोहम्मदच्या बालाकोट येथील तळांवर हवाई हल्ले केले होते. यानंतर, पाकिस्तानने भारतीय विमानांना हवाई हद्दीतून जाण्यास परवानगी नाकारली होती. पाकिस्तान हा महत्वाच्या हवाई मार्गाच्या मध्यभागी असल्यामुळे महत्वाचा ठरत आहे. २६ फेब्रुवारीपासून सुरू असलेली ही बंदी २९ मे रोजी संपणार होती. पाकिस्तानने यामध्ये १४ जूनपर्यंत वाढ केली आहे. यामुळे, दररोज शंभरपेक्षा जास्त व्यावसायिक विमानांना याचा फटका बसत आहे. यामुळे प्रवासाची वेळ वाढत असून इंधनाच्या खर्चात वाढ झाली आहे.
नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर इस्लामाबाद येथून इम्रान खान यांनी फोन करत मोदींनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी दक्षिण आशियात मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही देशाच्या पंतप्रधानांमध्ये बिश्केक, किर्गिस्तान येथे एससीओच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. परंतु, दोन्ही पंतप्रधानांमध्ये कोणतीही औपचारिक बैठक होणार नाही.