लंडन - इंग्लंडच्या डर्बीमधील गुरुद्वाऱ्याची तोडफोड केल्याप्रकरणी एका पाकिस्तानीला अटक करण्यात आली आहे. गुरु अर्जन देव जी गुरुद्वारा येथे हा हल्ला झाला होता. सोमवारी सकाळी हा हल्ला केला गेला आणि यानंतर हा आरोपी मूळचा पाकिस्तानी असल्याचे समोर आले.
गुरुद्वारा गुरु अर्जन देव जी यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुद्वाराचे नुकसान केलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या येथील साफसफाई सुरु असून हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून आणि आरोपीने दिलेल्या चिठ्ठीवरून असे दिसते की हा एक मुस्लिम व्यक्ती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे क्षेत्र बहुसांस्कृतिक समुदायाचे आहे. इथे सर्वधर्मीय लोक बर्याच वर्षांपासून एकत्र राहून एकत्र काम करत आहेत. या घटनेमुळे किंवा या संदेशामुळे येथील नागरिकांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण होणार नाही. हा प्रकार घडवणारा एक वैयक्तिक किंवा छोटा गट असू शकतो. आपण संपूर्ण मुस्लिम समुदायाला बदनाम करू शकत नाही. त्यामुळे, लोकांनी अशा भडकवणाऱ्या पोस्टपासून दूर राहावे, अशी विनंती गुरुद्वारा समितीमार्फत केली गेली.
या हल्ल्यानंतर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावर स्थानिक गुरुद्वारा समितीने लोकांना अशा आशयाच्या पोस्ट टाळण्याचा सल्ला दिला आहे. ह्या घटनेवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ही बातमी धक्कादायक आहे. आपल्याला मानवता टिकवायची असेल तर अशी असहिष्णुता आणि द्वेष संपणे गरजेचे आहे.