बंगळुरू - एकीकडे पंतप्रधान महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पित करतात. तर दुसरीकडे महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचणारे सावरकर यांचींही ते पूजा करतात, अशी टीका खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. कर्नाटकाच्या कलबुर्गीमधील एका सभेत ते बोलत होते. तसेच एआयएमआयएम ही भाजपाची 'बी टीम' असल्याचा आरोप करणाऱया पक्षांवरही त्यांनी हल्लाबोल केला.
असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. एकिकडे पंतप्रधान महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पित करतात. तर दुसरीकडे महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचणारे सावरकर यांचींही ते पूजा करतात. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कपूर यांनीही सावरकर यांचे गांधी हत्या कटात नाव घेतले होते. न्यायाधीश कपूर कमीशनच्या रिपोर्टमध्ये गांधीजींच्या हत्येमध्ये सावरकरांचा सहभाग होता, असा उल्लेख असल्याचे ओवैसी यांनी सांगितले.
एआयएमआयएम पक्षावर सातत्याने भाजपाची 'बी टीम' असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून होत असतो. या आरोपाला असदुद्दीन ओवैसी यांना खडेबोल सुनावले. कलबुर्गीमधील एका सभेत त्यांनी काँग्रेसचा बॅण्ड-बाजा पार्टी असा उल्लेख केला. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही हल्लाबोल केला.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यापासून आमच्यावर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप एकेकाळी काँग्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅण्ड-बाजा पार्टीकडून होत आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आम्हाला असेच संबोधण्यास सुरवात केली आहे. मात्र, मी फक्त जनतेचा आहे, असे औवेसी म्हणाले. काँग्रेस आमदार भाजपाला जाऊन मिळाले. आता ते मंत्री झाले आहेत. यावर ते काहीच बोलत नाहीत. मात्र, ते आमच्यावर टीका करतात, असेही ओवैसी म्हणाले.