श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या २७०हून अधिक दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. २०१९ आणि २०२०च्या आकडेवारीपेक्षा ही संख्या कमी असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत संख्या कमी..
या भागामध्ये दहशतवादी कारवाया, घुसखोरी आणि नागरिकांच्या हत्येमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. २०२०मध्ये सुरक्षा दलांनी १००हून अधिक यशस्वी दहशतवादी विरोधी कारवाया करत २२५ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, असेही सूत्रांनी सांगितले. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या एकूण दहशतवाद्यांपैकी २०५ दहशतवादी काश्मीर खोऱ्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.
२०१९मध्ये या भागात ४२१ सक्रिय दहशतवादी होते. तसेच, २०२०मध्ये ही संख्या ३००हून अधिक होती. २०१९मध्ये १६० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर २०१८मध्ये २५७ दहशतवाद्यांना संपवण्यात यश मिळाले होते.
दहशतवाद्यांना मदत केलेले ६३५ जण ताब्यात..
जम्मू-काश्मीर पोलिसांचे प्रमुख दिलबाग सिंह यांनी यापूर्वी सांगितले होते, की २०२०मध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ६३५ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्यापैकी ५६ जणांवर नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा : हवाई दलाची ताकद वाढणार; ८३ 'तेजस' लढाऊ विमानांच्या खरेदीस मंजूरी