नवी दिल्ली - दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाचे रुग्ण वाढत आहेत. हे पाहता, जवाहरलाल नेहरू स्टेडियमला 'क्वारन्टाईन सेंटर' बनवले जाणार आहे. नैऋत्य दिल्लीच्या जिल्हाधिकारी हरलीन कौर यांनी हा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या 'मरकज' कार्यक्रमानंतर अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना येथे ठेवले जाण्याची शक्यता आहे.
नैऋत्य दिल्लीत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे येथील जिल्हाधिकारी हरलीन कौर यांनी स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 'कोरोना विलगीकरण केंद्र' बनवले जावे, यासाठी स्टेडियम तत्काळ प्रभावाने हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.
निजामुद्दीन येथील कोरोना बाधित रुग्णांना या सेंटरमध्ये ठेवले जाणार - सूत्र
जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहरलाल नेहरू स्टेडियम कॉम्प्लेक्सचे कोरोना रुग्णांसाठी 'क्वारन्टाईन सेंटर' बनवले जाणार आहे. दिल्लीत निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक कार्यक्रम झाला होता. या वेळी, शेकडो लोक उपस्थित होते. यामध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. या बाधित लोकांना येथे बनवलेल्या विलगीकरण केंद्रात ठेवले जाणार आहे. यातील अनेक लोकांना याआधीच दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या पाहता काही लोकांना जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्येही ठेवले जाऊ शकते.