नवी दिल्ली - मागील 28 दिवसांपासून 12 जिल्ह्यामधून एकही कोरोनाची नवी केस समोर आली नाही. तर 78 जिल्ह्यांमध्ये मागील 14 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. त्यामुळे देशातील परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर 19 टक्के असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. 3 मेपर्यंत केंद्र सरकाराने सर्व राज्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असतानाच अर्थव्यवस्था सावरण्याचे आव्हानही केंद्र सरकारसमोर आहे.
मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 1 हजार 409 रुग्ण आढळून आले आहेत. तर देशभरात आत्तापर्यंत 21 हजार 393 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी याची माहिती दिली.