नवी दिल्ली - स्वातंत्र्य लढ्यातील हिरो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी 'पराक्रम दिन' म्हणून साजरी होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे. दरवर्षी २३ जानेवारीला नेताजींची जयंती असते. या दिवसाला आता नेताजींच्या धाडसी पराक्रमाची ओळख देण्यात आली आहे.
तरुणांना नेताजींच्या कार्यातून प्रेरणा मिळेल -
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि निस्वार्थीपणे देशाची सेवा केली. त्यांचा हा सन्मान आहे. नेताजींची जयंती दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून देशवासियांना मुख्यता तरुणांना प्रेरणा मिळेल. असंख्य अडचणी समोर असतानाही नेताजींनी लढा दिला. तरुणांमध्ये राष्ट्रवाद जागविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे.
१२५ व्या जयंतीनिमित्त घेतला निर्णय -
देशाप्रती नेताजींनी जी सेवा दिली, त्याची प्रत्येक भारतीय आठवण काढतो. त्यांच्या १२५ व्या जंयती निमित्त सर्वजण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ. २०२१ पासून २३ जानेवारी हा दिवस दरवर्षी पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे बंगालचे सुपूत्र होते. त्यातच आता बंगाल विधानसभा निवडणुकीआधी सरकारने हा निर्णय घेतला आहे.