पाटना - नेपाळने पुन्हा एकदा सीमा वादावरून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न केला आहे. बिरगुजं ते बिहारमधील राक्सौल या शहरांना जोडणाऱ्या पुलावर नेपाळ पोलिसांनी भूप्रदेशाचा दावा करणारा फलक लावला. विशेष म्हणजे दोन्ही देशातील हा भाग 'नो मेन्स लँड' म्हणजेच मानवी हस्तक्षेपास परवानगी नसणारा आहे. तरही या भूप्रदेशावर नेपाळने दावा केला. भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या हस्तक्षेपानंतर हा फलक काढून घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील बिरगुजं ते बिहारमधील राक्सौल या भागांना जोडणाऱ्या मैत्री पुलावर(फ्रेंन्डशिप ब्रीज) नेपाळ पोलिसांनी फलक लावला होता. राक्सौल हे ठिकाण बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात असून नेपाळ सीमेवर आहे. या गावापासून पुढे नेपाळची भूमी सुरु होते, असा दावा नेपाळने केला.
नेपाळमधील पारसा जिल्ह्याची हद्द बिहारमधील बिरगुंज गावापासून सुरु होते, असे या फलकावर लिहले होते. त्यावर नेपाळ प्रशासनाचा फोन नंबरही होता. बिरगुंजमधील स्थानिक नागरिकांनी नेपाळच्या या कृतीला आधी विरोध केला. त्यानंतर सीमा सुरक्षाचे जवानही तेथे दाखल झाले. भारतीय जवानांनी नेपाळी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी कठोर पवित्रा घेतल्यानंतर नेपाळने पुलावरील फलक हटविला. सीमेवरील शांतता भंग करण्याचा नेपाळचा हा पहिलाच प्रयत्न नाही. याआधीही त्यांनी मानवी हस्तक्षेपास परवानगी नसलेल्या भागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले होते.
यापूर्वी जून महिन्यात नेपाळने पंनथोला या गावात तात्पुरती छावणी आणि टेहाळणी टॉवर उभारला होता. सिरसवा नदीच्या किनाऱ्यावर हे अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळेही वादाला तोडं फुटले होते. दोन्ही देशातील लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर हे अतिक्रमण हटविण्यात आले होते. जून महिन्याच्या सुरुवातील नेपाळने केलेल्या गोळीबारात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर दोन जवान जखमी झाले होते.