नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशाला अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावच्या विरोधात उभे ठाकावे लागेल, असे म्हटले आहे.
सोनिया यांनी अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी बोलताना त्यांनी भारताच्या परंपरेवर भाष्य केले. भारत हा सत्य, अहिंसा, करुणा आणि देशभक्तीच्या सिद्धांतावर चालणारा देश आहे. येथे कट्टरता, अंधविश्वास, संप्रदायवाद, जातीवाद, असहिष्णुता अशा गोष्टींना अजिबात थारा नाही. देशाला अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावच्या विरोधात एक राष्ट्र म्हणून उभे ठाकावे लागेल जेणेकरुन आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र मिळेल, असे त्या म्हणाल्या.
देशातील प्रत्येकाने बंधूभाव, शांती आणि समानतेचा पुरस्कार करायला हवा. देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांची आठवण काढत सोनिया गांधी म्हणाल्या की, देशाच्या सशस्त्र दलाने दिलेल्या त्यागाला आपण कधीही विसरता कामा नये. तसेच राष्ट्र उभारणीसाठी झटणाऱ्या शेतकरी, मजूर, कलाकार, शिक्षक, लेखक यांच्याही योगदानाला देशाने विसरू नये. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणाऱ्या समाजाच्या निर्मितीसाठी देशातील युवकांनी झटले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, अहमद पटेल, ए.के अँटनी, मोतीलाल वोरा, कपिल सिब्बल तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.