नवी दिल्ली - बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील प्रभारी बनवण्यात आलेले आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीतील भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये 12 प्रचार सभा घेणार आहेत. याची सुरवात येत्या 23 तारखेपासून होत आहेत.
सासाराम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेस सुरवात होईल. त्यानंतर गया आणि बिहारमध्ये ते संबोधित करतील. तर 28 ऑक्टोबरला मोदी दरभंगा आणि पाटणामध्ये सभा घेतील. त्यानंतर पुन्हा 1 नोव्हेंबरला मोदी बिहारला येतील. छपरा, पूर्व चंपारण आणि समस्तीपूरमध्ये ते सभा घेतील. तर 3 नोव्हेंबरला मोदी चंपारण, सहरसा आणि अररियामध्ये सभा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची निवड भाजपचे स्टार प्रचारक म्हणून करण्यात आली आहे. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचाही समावेश आहे. तर बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.