नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता पंचायती राज दिवसाचे औचित्य साधून देशातील सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.
ग्रामीण भागांच्या विकासासाठी पंतप्रधान आज इ-ग्राम स्वराज्य पोर्टल आणि मोबाइल अॅप लाँच करणार आहेत. तसेच केंद्र सरकारच्या स्वामित्व या नव्या योजनेची सुरुवात आज केली जाणार आहे. तसेच देशभरातील लॉकडाऊनचा फटका ग्रामिण भागातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आज 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. सरकारने पंचायत राज्य पद्धतीला बळकट करणारी ७३ वी घटना दुरुस्ती केली. राष्ट्रपतींनी त्या दुरुस्तीला २० एप्रिल १९९३ रोजी मान्यता दिली आणि भारतात तिची अंमलबजावणी २४ एप्रिल १९९३ पासून सुरू झाली. केंद्र सरकारने राज्य सरकारांना पंचायती राज्य पद्धती सुरू करण्याकरीता कायदे करण्यास सांगितले. पंचायत राज संस्था स्वीकारणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य आहे.