आगरताळा - त्रिपुराची राजधानी आगरताळामध्ये दुर्गापुजेच्या वेळी हिंदू आणि मुस्लीम एकतेचा अनोखा संगम पहायला मिळतो. इथे हिंदू आणि मुस्लीम समाज मिळून दुर्गामातेची पूजा करतात. तेवढ्याच आत्मीयतेने हिंदू समाज देखील मुस्लीम सणांमध्ये सहभागी होतो. आगरताळाच्या तुलार मठ परिसरात हे हिंदू मुस्लीम एक्य अनुभवायला मिळते. या परिसरात बहुसंख्येने गरीब लोक राहातात.
विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून एक मुस्लीम महिला या दुर्गापूजा समितीची अध्यक्ष आहे. रोझी मिया असे या अध्यक्ष महिलेचे नाव आहे. रोझी मिया यांनी माहिती देताना सांगितले की, या उत्सवाला तब्बल 19 वर्षांची परंपरा आहे. 19 वर्षांपासून हिंदू आणि मुस्लीम दोघे मिळून माता दुर्गेची पूजा करतात. तसेच हिंदू समाज देखील मुस्लीमांच्या सणामध्ये सहभागी होतो. या परिसरात दोन्ही समाजांचे वास्तव्य आहे. मात्र सर्व सण उत्सव शांततेत पार पडतात. कधीही भांडणे वाद -विवाद होत नाहीत. असे रोझी यांनी सांगितले.