नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदाच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण, याविषयी चर्चा रंगली आहे. सध्या ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. व्होरा यांनी याआधी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. दरम्यान, व्होरा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. याविषयी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा बुधवारी जाहीर केला. 'काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहणे ही माझ्यासाठी सन्माननीय बाब होती. मी या संधीबद्दल ऋणी आहे आणि माझे या संघटनेवर नितांत प्रेम आहे. मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. जे घडले ते पक्षाच्या वाढीसाठी चिंताजनक आहे. या कारणाने मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे,' अशा स्वरूपाचे पत्र लिहीत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना आता आपण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नसल्याचे सांगितले आहे.
यानंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या दावेदारांविषयी चर्चा सुरू आहे. नवीन अध्यक्षांच्या नेमणुकीपर्यंत ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांच्याकडे पदाचा कार्यभार सोपवण्यात येईल, अशी चर्चा आहे.