दिल्ली/कासरगोड - नरेंद्र मोदींचे सत्तेतील पुनरागमन ही देशातील संवैधानिक संस्थांसाठी मृत्यूघंटा ठरेल, असे वक्तव्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केले. डावी आघाडी आयोजित 'केरळ संरक्षण यात्रे'त कासरगोड येथे ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ला, शबरीमलासह इतर मुद्यांवर भाष्य केले.
पुलवामा घटनेबद्दल येचुरी म्हणाले, या हल्ल्याकडे दहशतवादी हल्ला म्हणूनच पाहिले पाहिजे. दहशतवाद्यांच्या धर्मावर बोट ठेऊन त्याचा राजकीय फायदा घेऊ नये. या मुद्याचे धर्मांधीकरण करता कामा नये. दहशतवादाविरोधात देशाने एकत्रितपणे उभे राहणे गरजेचे आहे.
यावेळी येचुरींनी बंगालमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, की बंगालमध्ये आमची ताकद दिसून येते. पण, तृणमूलच्या हिंसेमुळे त्याचे मतात रुपांतर होत नाही. बंगालमधून तृणमूलला हटविणे आणि केंद्रात भाजपला रोखणे आमचा हेतू आहे.
केरळमध्ये डाव्या आघाडीने दोन ठिकाणाहून केरळ संरक्षण यात्रेचे आयोजन केले आहे. दक्षिण केरळच्या यात्रेचे नेतृत्व माकप राज्य सचिव कोडियारी बालकृष्णन यांनी केले. याचे उद्घाटन भाकप महासचिव एस. सुधाकर रेड्डी यांनी केले. तर, उत्तर केरळमधून भाकप राज्य सचिव कानम राजेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या यात्रेचे उद्घाटन माकप महासचिव सीताराम येचुरी यांनी केले.