नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या(रविवार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'स्वामित्व' योजनेचे उद्घाटन करणार आहेत. उद्या एका लाख लाभार्थ्यांना मालमत्ता पत्र (प्रापर्टी कार्ड) ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला कर्ज घेण्यासाठी किंवा इतर आर्थिक फायद्यांसाठी हे मालमत्ता पत्र उपयोगी ठरेल, असा हेतू या योजनेमागे आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'व्हर्च्युअली' या योजनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. एक लाख नागरिकांना एसएमएस लिंक द्वारे प्रापर्टी कार्ड मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर हे कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. सहा राज्यातील एकूण ७६३ गावातील लाभार्थ्यांना मालमत्ता पत्राचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १०० गावांचा समावेश आहे.
कर्ज घेण्यासाठी किंवा इतर आर्थिक फायद्यांसाठी जनतेला मालमत्ता पत्र उपयोगी ठरेल अशी आशा सरकारला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता पत्र वाटप करण्याचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. कार्यक्रमावेळी मोदी काही लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय पंचायत राज आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 'स्वामित्व' ही योजना केंद्र सरकारने यावर्षी एप्रिल महिन्यात 'पंचायत राज' दिनी सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण जनतेला मालमत्ता कार्ड देण्यात येणार आहेत.