नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज दिल्लीतील विद्यार्थ्यांशी 'शिक्षा : दिशा और दशा' या कार्यक्रमात जवाहरलाल स्टेडियममध्ये संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. तरुणांसमोर आज बरोजगारीचा प्रश्न उभा राहिला असून मोदी सरकार बेरोजगारीचे संकट आहे, हे सत्यच स्वीकारत नसल्याचे ते म्हणाले.
आपल्या भाषणादरम्यान त्यांनी विद्यापीठांच्या कुलगुरुंचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आजचे कुलगुरु हे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर राजकीय विचारसरणीच्या प्रसारासाठी काम करत असल्याचे ते म्हणाले. पुलवामा हल्ल्यात मरण पावलेल्या सैनिकांना आमचे सरकार निवडून आल्यावर शहीदांचा दर्जा देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मोदी सरकार शिक्षणाचे खाजगीकरण करत असून काँग्रेस त्याच्या सक्त विरोधात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. शिक्षणावरील सरकारचा खर्च वाढवण्याची गरज असताना खासगी उद्योगजकांना शिक्षण क्षेत्रात खुले रान दिले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोदींना दिलेल्या गळाभेटीचेही स्पष्टीकरण दिले.
हिसेंवर प्रेमानेच मात करता येते असे म्हणत त्यांनी आपली आज्जी इंदिरा गांधी आणि वडिल राजीव गांधींचे उदाहरण दिले. हिंसेचे परिणाम भोगलेला व्यक्ती कधीच हिंसेचे समर्थन करणार नाही, असे म्हणत त्यांनी देशातील वाढत्या हिंसेवर बोट ठेवले. माझ्या आज्जींवर गोळी चालवणारा त्यांचा सुरक्षारक्षक सतवनसिंग यानेच मला लहानपणी बॅडमिंटन खेळायला शिकवल्याचे त्यांनी सांगितले.