तेहरान (इराण) - तेहरानमध्ये अडकलेल्या ३१० भारतीयांना शनिवारी मिहान एअरच्या विमानातून दिल्लीत आणण्यात आले आहे. हे सर्वजण लडाखमधील आहेत. त्यांना विशेष विमानाने लेह येथे त्यांच्या घरी पाठवण्यात येईल.
३१० भारतीय यात्रेकरूंची एक टीम तेहरानमध्ये अडकली होती. दरम्यान, शनिवारी नागरी उड्डायन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की, वंदे भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त लोक देशात परत आले आहेत.
मिशन वंदे भारत अंतर्गत आतापर्यंत 13,000 हून अधिक लोक विविध भारतात परत आले आहेत. शनिवारी नेवार्क, लंडन, दुबई आणि अबू धाबी येथून एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातून 812 नागरिक परत आले आहेत, अशी माहिती पुरी यांनी ट्विटरवर दिली.
विदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी ७ मे रोजी वंदे भारत मिशन सुरू करण्यात आले आहे. या मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात एअर इंडीयाचे तीन विमान दुबई आणि अबुधाबीला पाठवण्यात आले होते.
या मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात विविध ४० देशांत अडकलेल्या भारतीयांना १४९ विमानांद्वारे मायदेशी आणण्यात येईल.