चैन्नई - कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्यावर मात करण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या स्थलांतरीत कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहानलेल्या आणि भुकेल्या अवस्थेत कामगारांनी आपल्या घराची वाट धरली आहे. तामिळनाडूमधील कवारापेट्टाई येथे एका कामगाराचा उपाशीपोटी चालल्यामुळे मृत्यू झाला आहे.
राम दे वास (वय 42) हा मजूर कवारापेट्टाईहून बिहारममधील मूळ घरी परत जात होता. कडक उन्हात घामाच्या धारा वाहत असतानाही त्याने प्रवास सुरूच ठेवला. बराच वेळ चालल्यानंतर तो अचानक रस्त्यावर कोसळला. उपाशी पोटी बराच वेळ चालल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता डॉक्टारांनी व्यक्त केली. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाऊनचा देशातील जनतेवर आणि त्यातही विशेषतः कामगार, मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांवर संकट कोसळले आहे. भारतात लाखो कामगारांचे जीवन हे रोज मिळणाऱ्या कामावर असून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून त्यांची कशीबशी गुजराण होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पोट भागवणार कसे? हा यक्षप्रश्न या मजूरवर्गासमोर आ वासून उभा राहिला आहे.