श्रीनगर - पीडीपीच्या अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पारिमपोरा भागात झालेल्या खोट्या चकमकीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी शुक्रवारी केली. तसेच विद्यार्थ्यांचे मृतदेह कुटुंबीयांना परत करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी जम्मू काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना पत्र लिहिले आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे सैन्यदलाची बदनामी होत असून हे मानवी अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 30 डिसेंबरला पारिंपोरा येथे झालेल्या दुर्घटनेत 17 वर्षांच्या तीन मुलांना ठार करण्यात आले. स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांचे कथित अहवाल विरोधाभास निर्माण करणारे आहेत. त्यामुळे तपास प्रक्रियेला गती मिळाल्यास या प्रकरणात लवकरच न्याय मिळू शकतो, असे त्या म्हणाल्या. म्हणूनच या प्रकरणाची त्वरित निष्पक्ष चौकशी सुरू करणारे पत्र मुफ्ती यांनी लिहिले आहे.
श्रीनगरच्या पारिमपोरा परिसरात बुधवारी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र मृतांच्या कुटुंबीयांना हा दावा फेटाळला असून यातील दोघे विद्यार्थी असल्याचे सांगितले आहे. तसेच या मुलांचा कोणत्याही दहशवादी संघटनांनी संबंध नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
राजौरी जिल्ह्यात तीन व्यक्तींच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सैन्य अधिकाऱ्यासह दोघांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. संबंधित खोटी चकमक शोपिअन प्रांतातील अशिमपोरा भागात झाली होती, असे मुफ्ती यांनी अधोरेखित केले आहे.