नवी दिल्ली - मध्यप्रदेशात राजकीय नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला रामराम ठोकत बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह 22 आमदारांनी राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकार आल्पमतात आले आहे. मात्र, सभागृहात आम्ही बहुमत सिद्ध करु, असा दावा काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसने 95 आमदारांना सुरक्षिततेसाठी भोपाळहून विशेष विमानाने बुधवारी राजस्थानातील जयपूर शहरात हलविले. यामध्ये काँग्रेसच्या 92 आमदारांसह तीन अपक्ष आमदारांचा समावेश आहे. अशा 95 आमदारांच्या सुरक्षेतची जबाबदारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर आहे. आमदारांना जयपूरमधील 2 रिसॉर्टवर ठेवले आहे. सभागृहातील बहूमत चाचणीवेळीच त्यांना परत भोपाळला नेण्यात येणार आहे.
डिसेंबर 2018 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आली होती. मध्य प्रदेश विधानसभेत एकूण 230 जागा आहेत. 230 सदस्य संख्या असलेल्या मध्यप्रदेशच्या विधानसभेत 2 आमदारांच्या निधनानंतर 228 आमदार राहिले आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे 114 आणि भाजपचे 107 आमदार आहेत. समाजवादी पक्षाचा 1, बहुजन समाज पक्षाचे 2 आणि 4 अपक्ष उमेदवारांच्या मदतीनं काँग्रेसनं 121 सदस्यांचा पाठिंबा मिळवला आहे. त्यापैकी 22 आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या 95 झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार टिकेल का? हे बहूमत चाचणीनंतर कळेल.