भोपाळ (मध्य प्रदेश) - राजस्थानची परिस्थिती व्यवस्थित होत नाही तोच शुक्रवारी मध्य प्रदेशमध्ये एका काँग्रेस आमदाराने राजीनामा दिला आहे. सुमित्रा देवी कासडेकर यांनी आपला राजिनामा हंगामी विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या घरी देवी यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा, मंत्री अरविंद भदोरिया आणि मोहन यादव हे उपस्थित होते. हंगामी विधानसभा अध्यक्ष शर्मा म्हणाले, मी कासडेकर यांना राजीनामा देण्याचा फेरविचार करायला सांगितला. तरिही त्यांनी न ऐकल्याने मी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. मार्च महिन्यात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह 22 आमदारांनी राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. परिणामी मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार अल्पमतात आले.
नुकतेच काँग्रेस आमदार प्रद्युम्नसिंह लोधी यांनी राजिनामा देऊन भाजप प्रवेश केला होता. त्यानंतर मध्य प्रदेश विधानसभेची सदस्य संख्या 205 झाली आहे. भाजपकडे सध्या 107 आमदार, बसपाकडे 2, सपाकडे 1 तर अपक्ष 4 आमदार आहेत. येत्या काही दिवसात मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 26 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.