नवी दिल्ली - आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ या सणाच्या काळात मेणबत्त्या लावाव्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले. पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे. तसेच भारतीयांमध्ये एकतेची गरज आहे आणि त्यात फूट पाडणाऱ्या या शक्तीबद्दलही त्यांनी देशवासियांना सावध केले.
ते म्हणाले, एकता ही शक्ती आहे. एकता हे सामर्थ्य आहे. तथापि, असे घटक आहेत जे आपल्यामध्ये संशयाचे बीज रोपण्याचा प्रयत्न करतात, आमचे विभाजन करतात, असेही ते म्हणाले. मात्र, देशानेही प्रत्येक वेळी चोख उत्तरे दिली आहेत, असेही पंतप्रधानांनी 31 ऑक्टोबर या राष्ट्रीय एकता दिनापूर्वी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 31 ऑक्टोबरला गुजरात राज्यातील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ यूनिटी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
तर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या सुरूवातीला दसर्याला शुभेच्छा दिल्या. दसर्याचा हा उत्सव असत्यावर विजय मिळवण्याचा सण आहे, पण त्याचबरोबर संकटावर संयम राखून विजय मिळवण्याचा सणही आहे, असे ते म्हणाले. यापूर्वी दसर्याला मोठ्या जत्रा भरत. पण यावेळी त्यांचे स्वरूप वेगळे आहे. "रामलीलाचा सण देखील एक मोठे आकर्षण होते, परंतु त्यावर काही निर्बंध आले आहेत, असे मोदी म्हणाले.