पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीत कौटुंबिक बाबींनाही राजकारणाचा आखाडा बनवला जात असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या सूनबाई ऐश्वर्या राय यांनी नितीश कुमारांना समर्थन दिले आहे. ऐश्वर्या यांचे वडील चंद्रिका राय हे जेडीयूच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. ऐश्वर्या राय यांनी चंद्रिका राय यांच्यासाठी रोड शो केला.
चंद्रिका राय हे पारसा विधानसभा मतदारसंघातील जेडीयू उमेदवार आहेत. त्यांनी येथून आरजेडीच्या तिकिटावर शेवटची निवडणूक जिंकली होती. त्यांची मुलगी ऐश्वर्या रायचे लग्न लालूप्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांच्याशी झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. ऐश्वर्या राय यांनी लालूंच्या कुंटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला होता. हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. दोन्ही कुटुंबांमधील संबंध बिघडल्यानंतर चंद्रिका राय हे नितिशकुमार यांच्या पार्टीत सामील झाले.
दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 नोव्हेंबरला -
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील 71 जागेसाठी मतदान पार पडले आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यातील 94 जागांवर मतदान होणार आहे. एकूण 1 हजार 463 उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये महागठबंधनची सर्वांत मोठी परीक्षा आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचेही भाग्य ठरणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातच पारसा मतदारसंघात मतदान होणार आहे.