दिल्ली - बिहार निवडणुकांमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन झाले आहे. बुधवारी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुका पडल्या. अध्यक्ष पदाच्या निवडणुकामध्ये महागठबंधनच्या नेत्याचा विजय व्हावा, यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी एका एनडीच्या आमदाराला फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एनडीएने केला आहे. संबधित आमदाराने आज लालू प्रसाद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. सरकार पाडण्याच्या कटात आपल्या सामील करण्याचा प्रयत्न लालू यांनी केला. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून माझा पक्ष आणि सरकार माझ्यासोबत आहे, असे पीरपैती येथील भाजपाचे आमदार ललन पासवान यांनी म्हटले.
माझ्यासारख्या नवख्या आणि लोकशाहीवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या आमदाराला लालू प्रसाद यादव यांनी आमिष दाखवले. हे फारच चिंताजनक आहे. त्यांनी मला सरकार पाडण्याच्या कटात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. यावरून मी निगरानी ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, असे आमदार ललन पासवान म्हणाले. ललन पासवान यांनी ऑडियो क्लीपमधील संभाषणाची लिखित स्क्रिप्ट तक्रारीसोबत ठाण्यात जमा केली आहे.
एनडीएचा दावा -
सुशील मोदी यांनी बुधवारी टि्वट करत लालू आणि भाजपा आमदार ललन पासवान यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लीप टि्वटवरून जारी केली होती. त्यामध्ये लालू प्रसाद यादव एनडीएच्या आमदाराला मंत्रीपदाचे आमिष देत असून कोरोनाचं कारण देत अनुपस्थित राहण्यासाठी सांगत आहेत, असा दावा एनडीएने केला आहे. तसेच मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनींही लालूंवर पक्ष फोडण्याचा आरोप केला आहे. लहान पक्षांना ते नेहमीच फोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांची फार जुनी सवय आहे, असे जीतन राम मांझी म्हणाले.
विधानसभेच्या अध्यक्षपद निवडणूक -
बिहार विधानसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी मतदान पार पडले. महागठबंधनच्या बाजूने अवध बिहारी चौधरी तर एनडीएच्या बाजूने माजी मंत्री आणि लखीसराय येथील आमदार विजय सिन्हा मैदानात होते. विजय सिन्हा यांचा विजय झाला असून त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक एनडीएच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होती. विजय सिन्हा यांच्या बाजूने 126 आणि विरोधामध्ये 114 मते पडली.
हेही वाचा - जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा