चेन्नई - तमिळनाडूच्या पुडुकोट्टाई जिल्ह्यात एका महिला तांत्रिकाला तिच्या सहाय्यकासह गुरुवारी अटक करण्यात आली. या तांत्रिकाच्या सांगण्यावरून एका 13 वर्षीय मुलीची तिच्याच वडिलांनी हत्या केल्याची घटना घडली होती.
या महिला तांत्रिकाच्या सांगण्यावरून पनीरसेल्वम या ५५ वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलीची गळा आवळून हत्या केली होती. मुलीच्या हत्या केल्यास मुलाची प्राप्ती होईल व श्रीमंत देखील होशील, अशी बतावणी या महिला तांत्रिकाने ५५ वर्षीय व्यक्तीला केली होती. दरम्यान मंगळवारी मुलीची हत्या करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा बनाव पनीरसेल्वम याने रचला होता. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आपणच तांत्रिकाच्या सांगण्यावरून मुलीची हत्या केल्याचे त्याने कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी महिला तांत्रिक व तिच्या सहकाऱ्याला अटक केली.