कोलकाता - पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यांवर उद्या (२० मे) अम्फान हे चक्रीवादळ येऊन धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका हा कोलकाता शहराला बसणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
अम्फानचा फटका देशातील पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यांसह अंदमान-निकोबार बेटांना बसणार आहे. येत्या सहा तासांमध्ये चक्रीवादळाचा जोर कमी होईल, मात्र त्यानंतर हे चक्रीवादळ रौद्ररूप धारण करेल, ज्याचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगाल आणि ओडिशाला बसेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पश्चिम बंगालमधील पूर्व आणि पश्चिम मिदनापोर, दक्षिण २४ परगणा आणि कोलकाता या भागांना अम्फानचा सर्वाधिक फटका बसणार आहे. तसेच, यानंतर येणाऱ्या हुगळी वादळाचाही या शहरांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा : बांगलादेशात अडकलेले १६९ भारतीय मायदेशी परतणार; ११९ विद्यार्थिनींचा समावेश