तिरुवअनंतपूरम - केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची मतमोजणी सुरू असून सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रँट (एलडीएफ) ने अनेक जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रँट (यूडीएफ) पिछाडीवर असल्याचे आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालावरून दिसून येत आहे.
कम्युनिस्ट पार्टी (मार्कसवादी) च्या नेतृत्त्वाखालील एलडीएफ पक्षाने ९४१ पैकी ५०० ग्रामपंचायतीवर झेंडा रोवला आहे. सहा पैकी चार महानगपालिका, १४ पैकी १० जिल्हा पचायंती आणि १५२ गट पंचायतींपैकी ११२ पंचायतींवर विजय मिळवला आहे.
युडीएफचा बालेकिल्ला असलेल्या थ्रिसूर, एर्नाकुलम, कोट्टायम जिल्ह्यात एलडीएफने खिंडार पाडली आहे. या ठिकाणची मते मिळवण्यात सत्ताधारी एलडीएफने यश मिळविले आहे. मागील वर्षी काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या जागेवर केरळमध्ये मोठा विजय मिळाला होता. मात्र, आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पिछाडीवर पडला आहे.
आताच्या निवडणुकीत भाजपानेही सर्व शक्ती पणाला लावली होती. मात्र, थ्रिसूर आणि तिरुवअनंतपूरम महानगरपालिकेत भाजपा पिछाडीवर गेली आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींवर भाजपाने विजय मिळवला आहे. तर एक महानगरपालिकाही जिंकली आहे. पुढील वर्षी केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना महत्त्व प्राप्त झाले आहे.