थ्रिथाला- 59 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून कृष्णन नावाच्या व्यक्तीला थ्रिथाला पोलिसांनी रविवारी अटक केली. हा प्रकार केरळमधील पालक्काड जिल्ह्यात घडला आहे.
कृष्णन (57) हा काक्कात्तिरी गावातील रहिवासी असून थ्रिथाला येथे त्याचे स्टेशनरीचे दुकान आहे. त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. पीडित मुलींपैकी एका मुलीने तिच्या पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी अधिक तपास केल्यानंतर अनेक मुलींवर त्याने अत्याचार केल्याचे समोर आले.
चॉकलेट आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेल्या मुलींवर कृष्णन याने अत्याचार केले. तो गेल्या काही वर्षांपासून मुलींवर अत्याचार करत असून या प्रकाराची बाहेर वाच्यता करु नये म्हणून त्यांना धमकावत असे. बालहक्क कार्यकर्ते आणि पालकांनी थ्रिथाला पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलींचे जबाब नोंदवले आहेत.