मालदीव- भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. त्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. याबाबत त्याला मालदीवकडूनही निराशा हाती लागली आहे. भारताने घेतलेल्या निर्णयाला मालदीव सरकारने पाठिंबा देत तो भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे पाकिस्तानला सांगितले आहे.
मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी त्यांचे समतुल्य परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांना कॉल केला होता. त्यात परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी त्यांना काश्मीरमध्ये भारत सरकारने केलेल्या कारवाई बाबत माहिती दिली. त्याचबरोबर भारताने काश्मीर मधून हद्दपार केलेल्या कलम ३७० बाबत पाकिस्तान सरकारची भूमिका देखील सांगितली.
याबाबत मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला यांनी कुरैशी यांना सांगितले की, पाकिस्तान आणि भारत हे दोघेही मालदीवचे चांगले मित्र देश आहे. या दोन्ही देशांचे मालदीव सोबत चांगले द्विपक्षीय संबंध आहे. या दोन्ही उभयंतांनी प्रेमाणे चर्चेच्या माध्यमातून हा विषयी मार्गी काढावा. काश्मीरमध्ये भारताने केलेली कारवाई हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यांचबरोबर, मालदीव हा पाकिस्तानचा नेहमीच जवळचा मित्र देश राहणार आहे. पाकिस्तान आणि मालदीव हे दोन्ही देश आंतरराष्ट्रीय, प्रादेशीक मुद्यावर परस्परांना सहयोग करतील असा विश्वास परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी व्यक्त केला आहे.