श्रीनगर - कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर कोणताही हिंसाचार होऊ नये, यासाठी तगडा बंदोबस्त जम्मू आणि काश्मिरमध्ये ठेवण्यात आला आहे. जमावबंदीचे आदेश आणि अनेक भागात कर्फ्यू असल्यामुळे नागरिक भीतीपोटी घरातच अडकले आहेत. बाजारपेठा आणि व्यवहार बंद असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
बँकाचे एटीएम बंद असून लोकांना पैशासाठी चणचण जाणवत आहे. खायचेही वांदे झाल्याचे एका नागरिकाने सांगितले. शाळा महाविद्यालये बंद असून याचाही फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.
रुग्णालये सुरू असून इथे उपचार सुरू आहेत. रस्त्यावर अॅम्ब्यूलन्स सोडली तर इतर वाहने धावताना दिसत नाहीत. शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी कर्फ्यूमध्ये सवलत देण्यात आली असली तरी लोक घराबाहेर पडलेच नाहीत असे अनेक ठिकाणचे चित्र आहे. जनजीवन पुन्हा पूर्ववत होण्यासाठी अजून काही अवधी लागेल असेच सर्वत्र चित्र पाहायला मिळत आहे.