श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा करण्यात आला. १४ फेब्रुवारीला जवानांच्या बसेसच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा गाजी रशीद आणि कामरान या दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. या कारवाईत एका मेजरसह ४ जवानांना वीरमरण आले. एका नागरिकाचाही मृत्यू झाला. एक जवान जखमीही झाला आहे.
डेहराडूनचे मेजर व्ही एस. धोंडियाल, झुंझुनू येथील हवालदार शेओ राम, मीरत येथील अजय कुमार आणि रेवाडी येथील हरी सिंग अशी हुतात्म्यांची नावे आहेत. आणखी एक जवान जखमी झाला आहे. परिसरात २-३ दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. कारवाई सुरू आहे. येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
गुरुवारी पुलवामामध्येच सीआरपीएफच्या जवानांच्या बसेच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला होता. यात ४० हून अधिक जवान हुतात्मा झाले होते. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. आता भारताने पाकिस्तानवर दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे.
गृहमंत्रालयाचे निवेदन
गृहमंत्रालयाने रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये आवश्यक सामग्रीची ने-आण आणि काही इतर कारणांमुळे निमलष्करी दलांच्या ताफ्याला रस्तेमार्गाने जाण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे हे सुरू राहील. मात्र, मंत्रालयाने राज्यात सैनिकांना पोहोचवण्यासाठी हवाई सेवांचा वापर वाढविला आहे. गुरुवारी पुलवामा येथे सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यानंतर मंत्रालयाने ही निवदेन जारी केले आहे.