श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांना लक्ष्य करून होत असलेल्या हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. आज पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात ९ जवान जखमी झाले आहेत. चालकासह तीन जवानांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जवानांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लष्कराच्या ४४ राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनाला लक्ष्य करून हा स्फोट घडवण्यात आला. पुलवामामधील अरिहर गावातील अरिहर-लस्सीपुरा रस्त्यावर लष्कराची वाहने गस्तीसाठी जात असताना हा आयईडी स्फोट घडवण्यात आला. हा स्फोट भयंकर होता. त्यात लष्कराच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, या भागात लष्कर आणि दहशतवाद्यांदरम्यान मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून आयईडी हल्ला करण्यात येईल, असा अलर्ट एका दिवसापूर्वीच आला होता. त्यानंतर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. मात्र, हा स्फोट झाल्यानंतर लष्कराने जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. 'सर्व जवान सुरक्षित आहेत. काही जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे,' अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.