नवी दिल्ली - जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी जंतर मंतरवर कँडल मार्च काढला. त्यांनी सराकरला ही खासगी एअरलाईन्स वाचवण्याची मागणी केली. ग्राऊंड ड्युटी स्टाफ, कॅबिन क्रू सदस्य, प्रशासन आणि विक्री विभाग यांच्यासह जेटचे एकूण ५०० कर्मचारी आहेत. जेट सध्या आर्थिक अडचणीत असून कर्मचाऱ्यांचे पगार मागील ३ महिन्यांपासून देण्यात आलेले नाहीत. या कर्मचाऱयांनी त्यांच्या कुटुंबीयांसह नोकऱ्या वाचवण्यासाठी सरकारला कळकळीची विनंती केली आहे.
'आमचा आक्रोश ऐका, ९Wला पुन्हा उडण्यास सज्ज करा, आमच्यावर अनेकजणांची पोटे अवलंबून आहेत, कृपया आमच्या ९Wला रक्तबंबाळ होऊ देऊ नका, जेट एअरवेजला वाचवा, आमच्या कुटुंबांना वाचवा,' अशा आशयाचे फलक या कर्मचाऱ्यांनी हातात घेतले होते. याआधी जेटच्या ५०० कर्मचाऱ्यांनी बंगळुरु येथे निदर्शने करत सरकारला कंपनी वाचवण्याची विनंती केली होती.
नरेश गोयल यांनी कंपनीची स्थापना केली असून एअरलाईन्समध्ये काम करणारे जवळपास २० हजार कर्मचाऱयांसमोर बेरोजगार होण्याची समस्या उभी राहिली आहे. जेटने १७ एप्रिलला आंतरराष्ट्रीयसह सर्व १७ विमानांची उड्डाणे तात्पुरती स्थगित केली. एअरलाईन्सने जारी केलेल्या निवेदनानुसार कर्जदारांकडून आणीबाणीतील निधी उपलब्ध न झाल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. जेटला कर्ज देणाऱ्या भारतीय स्टेट बँकेने त्यांची पैशांची निकड भागवणे शक्य नसल्याचे सांगितले होते.