पाटणा - बिहारमध्ये विधासभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जनता दल (यू)ने विधान परिषद सदस्य दिनेश प्रसाद सिंह यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यांच्यावर मुलगी कोमल सिंहसाठी प्रचार केल्याचा आरोप आहे. कोमलसिंह या गायघाट विधानसभा मतदारसंघात लोकजनशक्ती पक्षाच्या उमेदवार आहेत.
दिनेश प्रसाद सिंह, हे एलजेपी पक्षाच्या वैशाली मतदारसंघातील खासदार वीणा सिंग यांचे पती आहेत. जदयूचे अधिकृत उमेदवार महेश्वर प्रसाद यादव यांच्याऐवजी गायघाट मतदारसंघातील जदयू कार्यकर्त्यांना कोमल सिंहसाठी कामाला लावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान -
बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा मंगळवारी पार पडला. यामध्ये 94 जागांवर सुमारे 1500 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. तर एकूण 53.51 टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 41 हजार 362 मतदान केंद्रांवर मतदान झाले. तर 7 नोव्हेंबर तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे.