नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपा-जेडीयू आघाडी आणि महागठबंधनमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. 'जनता दल युनायटेड (जेडीयू) निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करेल', असा विश्वास जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सचिव के. सी त्यागी यांनी व्यक्त केला आहे.
त्यागी यांनी ईटीव्ही भारतशी बिहार निवडणुकासंबंधी खास चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची कार्यकर्ते वाट पाहत होते. नितीश कुमार यांनी १५ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलेली विकासकामे आणि आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी १५ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाची तुलना हा या निवडणुकीचा मुख्य मुद्दा असणार आहे. लालू प्रसाद यादव यांच्या काळातील सरकारी गोंधळ नागरिक अजूनही विसरले नाहीत. बिहारचा विकास करण्यासाठी नितिश कुमार यांनी कठोर परिश्रम केल्याचे त्यागी म्हणाले.
जेडीयू पक्षाने लोक जनशक्ती पक्षाशी (एलजेपी) २००५, २०१० आणि २०१५मध्ये कधीही आघाडी केली नव्हती. जेडीयू पक्षाची भाजपासोबत आघाडी आहे. तसेच, आमची बिहारमधील स्थिती मजबूत आहे. विरोधी महागठबंधनची राज्यात एकजूट नसल्याचे त्यागी म्हणाले. जितन राम मांझी यांनी महागठबंधनला रामराम ठोकला. तर, उपेंद्र कुशावह हे सुद्धा सोडून जाण्याची शक्यता आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदावार म्हणून स्वीकारण्यास कोणीही तयार नाही, असे ते म्हणाले.
निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या निवडणुकीसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. २४३ सदस्यसंख्या असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबत माहिती दिली.