नवी दिल्ली - बॉलिवुडच्या बहुचर्चीत अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवशानंतर जयाप्रदा या उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदार संघातून समाजवादी पक्षाचे कट्टर नेते आजम खान यांच्या विरोधात निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरू शकतात. जयाप्रदा यांनी २००४ मध्ये समाजवादी पक्षातून काँग्रेसविरोधात निवडणूक जिंकली होती.
मला मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. माझा जीवनातील प्रत्येक क्षण भाजपसाठी समर्पित करून पक्षात काम करणार, असे जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटले.
समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आजम खान रामपूर येथून निवडणूक लढवत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जयाप्रदा येथूनच निवडणूक लढवणार, असे कयास लावले जात आहेत.
समाजवादी पक्षात असताना जयाप्रदा यांनी आजम खान यांच्या मदतीने येथून निवडणूक जिंकली होती. मात्र, दोघांची मैत्री लवकरच दुश्मनीमध्ये बदलली. त्यानंतर २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा जयाप्रदा यांना रामपूर येथून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी आजम खान यांनी त्यांना विरोध केला होता. असे असतानाही जयाप्रदा प्रचंड बहुमतांनी तेथून विजयी झाल्या होत्या.
आजम खान यांनी अनेक वेळा जयाप्रदा यांना नाचणारी म्हणून संबोधले होते. तुम्ही राजकारण सोडून सिनेमांमध्ये काम करा, असा सल्ला ते त्यावेळी प्रदा यांना द्यायचे. त्यानंतर २०१४ची निवडणूक जयाप्रदा यांनी बिजनौर येथून आरएलडीच्या तिकीटावर लढावी लागली होती. त्यामध्ये मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.